गोमांस आढळल्यास थेट मोक्का लावणार शांतता समितीच्या बैठकीत पोलिस आयुक्तांचा इशारा; १३ जण यापूर्वीच तडीपार

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहरात शांतता व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या १३ जणांना यापूर्वीच तडीपार करण्यात आले असून, आणखी ११७संशयितांवर तीन दिवसांच्या तडीपारीची कारवाई प्रस्तावित आहे. तसेच, शहरातील कोणत्याही हॉटेलमध्ये गोमांस शिजवले जात असल्याचे किंवा त्याची वाहतूक होत असल्याचे आढळल्यास हॉटेल चालकासह संबंधितांवर थेट मोक्काअंतर्गत कडक कारवाई केली जाईल, असा थेट आणि कडक इशारा पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी दिला आहे. शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
पोलिस आयुक्त कार्यालयात सोमवारी (दि. २५) बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पोलिस आयुक्तांनी शहरातील प्रमुख धर्मगुरू, मौलाना, लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. महापालिकेने नेमून दिलेल्या कत्तलखान्यांमध्येच कुर्बानी करावी, उघड्यावर मांस ने-आण करू नये, तसेच शासनाने बंदी घातलेल्या जनावरांची कुर्बानी
करू नये, असे स्पष्ट निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. समाजकंटकांनी उपद्रव केल्यास किंवा सोशल मीडियावरून अफवा पसरवल्यास तातडीने ११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीला उपायुक्त (गुन्हे) प्रशांत मोहिते, परिमंडळ १ चे उपायुक्त पंकज अतुलकर, परिमंडळ २ चे उपायुक्त रत्नाकर नवले, सर्व सहायक आयुक्त, पोलिस निरीक्षक, मौलाना अब्दुल रशीद मदनी, मौलाना इकबाल अन्सारी, मनपा विरोधी पक्षनेता समीर साजिद बिल्डर, नगरसेवक रशीद मामू, जावेद कुरेशी, ईसा कुरेशी, डॉ. मुर्तुजा, गजानन बारवाल यांच्यासह मोठ्या
संख्येने नागरिक उपस्थित होते.
वाहतुकीत बदल
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेने २८ मे रोजी सकाळी ५ ते ११ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल केले आहेत. मिलिंद चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज ते पाणचक्की गेट हा मार्ग बंद राहील. हडको कॉर्नर ते उद्धवराव पाटील चौकादरम्यान रोजाबाग ईदगाहकडील रोडची एक बाजू बंद राहील. वाहनांधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन सहायक निरीक्षक सचिन मिरघे यांनी केले आहे.
तगडा बंदोबस्त
बंदोबस्तासाठी ४ पोलिस उपायुक्त, ७ सहायक आयुक्त, २५ पोलिस निरीक्षक, ५८ एपीआय/पीएसआय, ९८६ अंमलदार, ४९ महिला अंमलदार, ७ कॅमेरामन, राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी, ४०० पुरुष व १०० महिला होमगार्ड, तसेच मोठ्या प्रमाणावर पोलिस अधिकारी आणि अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी ३ विशेष पथके (१ गुन्हे शाखा, २ परिमंडळ विभाग) स्थापन करण्यात आली असून, ६ ठिकाणी २४ तास चेक पोस्ट राहतील.
संशयितांची यादी पोलिसांकडे
गोमांस कोठून येते, याची पोलिसांना माहिती आहे. यासंदर्भात फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. अनेक संशयितांच्या नावांची यादी पोलिसांकडे तयार असून, काही अवैध प्रकार आढळल्यास कठोर कारवाईचे आदेश आहेत. महाराष्ट्र प्राणी संवर्धन कायद्याचे सर्वानी पालन करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions